छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) दि.२० औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटीच्या वतीने मोठा गाजावाजा करत संपूर्ण शहरात सौंदर्य करण केले होते.त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला होता. आकर्षक रोषणाई, चकाचक रस्ते झाल्यामुळे, नागरिक बऱ्यापैकी सुखावले होते. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. किंबहुना प्रशासनाला तो टिकवता आला नाही.शहरांतल्या अनेक बेटापैकी एक बेट हर्सूल टी पॉईटवर उभारण्यात आले होते.मोठे गोल बेट तयार करून त्यात माती, मुरूम भरून हिरवळीचे अच्छादन चढवले होते. रंगीबेरंगी लायटिंग, रंगीत फोकस, वर मोठे हॅलोजन लावल्यामुळे हा पॉईंट चकचकीत आणि आकर्षक झाला होता. शहरातील नागरिक या ठिकाणी सेल्फी काढत होते. परंतु आज या ठिकाणी आपण पाहिले तर मनपाने या सौंदर्य बेटावर बुलडोजर फिरवला आहे.स्मार्ट सिटीने तयार करून ठेवलेले बेट नीट न सांभाळता महानगरपालिकेने या बेटावर आज बुलडोजर चढवला आहे.
या ठिकाणी पाण्याचे कारंजे बसवण्यात येणार आहे,असे सांगण्यात आले तरी महानगरपालिकेच्या डोक्यात नेमके चालले काय? ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.