छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ हे जिद्दी, त्यागी व माणुसकीवर नितांत प्रेम करणारे होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीमत्त्वाची आज गरज होती, असे प्रतिपादन शनिवारी कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत करण्यात आले.
ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत ॲड. डी. आर. शेळके यांच्या अध्यक्षतेखाली खोकडपुरा येथील आयटक कार्यालयात ही अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी दिवंगत गंगाधर गाडे व कॉ. अतुलकुमार अंजान यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करुन दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी, कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कॉ. मनोहर टाकसाळ प्रतिष्ठान, भाकप, आयटक, संविधानवादी, डाव्या व लोकशाहीवादी व परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भारतीय दलित पॅंथरचे नेते रमेशभाई खंडागळे, भाकपचे कॉ. अश्फाक सलामी, लाल निशाण पक्षाचे कॉ. भीमराव बनसोड, मराठाडा लेबर युनियनचे साथी सुभाष लोमटे,कॉ बुध्दीनाथ बराळ आदींनी कॉ. टाकसाळ यांच्या आठवणी जागवल्या.
कॉ. टाकसाळ हे जिद्दी होते. त्यागी होते. त्याहीपेक्षा ते माणुसकीवर नितांत प्रेम करणारे होते. कम्युनिष्ट कार्यकर्ता पोलिसांना न घाबरणारा असावा. कारागृहात जायला तयार असणारा असावा, या मताचे ते होते. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत. ते गांधीवादी कम्युनिष्ट होते, अशा शब्दांत वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या. हल्लीचं वातावरण पाहता संविधान बदलू इच्छिणार्या विचारसरणीचा हल्ला परतवून लावणे, हीच खरी टाकसाळ यांना आदरांजली ठरेल. त्यासाठी सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रा. भारत शिरसाट यांनी प्रास्ताविक करुन सूत्रसंचालन केले. कॉ. अभय टाकसाळ यांनी आभार मानले. कॉ. राम बाहेती, ॲड. डी. व्ही. खिल्लारे, जया गजभिये यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते