छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क):शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीत १५ नोव्हेंबरला पत्र्याची टाकी फुटून मकाखाली दबून ४ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचे समोर आले असून, गुन्हेही दाखल झाले आहेत.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने घटनेच्या चौकशीदरम्यान कंपनीच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश केला. विभागाच्या उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्या पथकाने कंपनीला दोनदा नोटिसा बजावून सात दिवसांत उत्तर देण्याचा आदेश दिला होता. मात्र, कंपनीने या नोटिसांकडे दुर्लक्ष केले आहे.
आता विभागाने पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. कंपनीकडून उत्तर न मिळाल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, करमाड पोलिसांनी या दुर्घटनेसाठी जबाबदार मानून कंपनीचे सहायक व्यवस्थापक सुरेंद्र खैरनार, महादेव पाटील, व लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर रिठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सर्व आरोपींना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.