छत्रपती संभाजीनगर ( निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ):१३ ऑक्टोबरला ठेकेदारांनी अपहरण केलेला ऊसतोड कामगार अद्याप परतला नाही. पित्याने आशेवर काही दिवस वाट पाहिली, मात्र अखेर १८ डिसेंबर रोजी सोयगाव पोलीस ठाण्यात ठेकेदारांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
घटनाक्रम: पळाशी तांडा येथील पंडित पेला चव्हाण (५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा राहुल याला ऊसतोड मजुरांसाठीच्या रकमेच्या वादातून अपहरण करण्यात आले. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी, महादेव जगदाळे, वैभव जगदाळे आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी लाल रंगाच्या कारने राहुलला जबरदस्तीने नेले.
रकमेचा वाद: राहुलच्या बँक खात्यातून मजुरांसाठी पाठवलेली रक्कम उचलून ठेकेदारांना दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित मजुरांना ती रक्कम मिळाली नाही, असा आरोप करत आरोपींनी राहुलला जबरदस्तीने उचलले.
पित्याची पोलिसांत तक्रार: पंडित चव्हाण यांनी ठेकेदारांकडे मुलाच्या अपहरणाचा जाब विचारला, मात्र कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल करत आहेत.