छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ) : शहरातून चोरलेल्या दुचाकी शेतातील गोठ्यात पांढऱ्या गोणीखाली लपवून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परसराम विठोबा डिघुळे (२५, रा. भालगाव, ह.मु. पाचोड, ता. पैठण) याने तब्बल ९ दुचाकी चोरून गोठ्यात साठवल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत त्याला अटक केली.
जुलै महिन्यात शेंद्रा एमआयडीसी परिसरातून शुभम बोरुडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. तपासादरम्यान ही दुचाकी पाचोड येथे असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांना समजले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित परसरामला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सिडको एमआयडीसी व करमाड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी गोठ्यात लपवलेल्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.