छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क): चिकलठाणा ते आकाशवाणी मार्गावर अवघ्या दीड तासांत ८ नागरिकांचे मोबाइल हिसकावून पसार होणाऱ्या दोन चोरट्यांना जवाहरनगर पोलिसांनी थरारक ५ किलोमीटर पाठलाग करत पकडले. त्यांच्या ताब्यातून ८ महागडे मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली स्पोर्ट्स बाइक जप्त करण्यात आली.
ही घटना मंगळवारी (१७ डिसेंबर) रात्री घडली. पोलिसांनी विशेष पथकाच्या साहाय्याने दर्गा चौक ते गोल्डी टॉकीजपर्यंत पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी चिकलठाणा, सिडको, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, जवाहरनगर, उस्मानपुरा आणि जिन्सी या भागांमध्ये एकापाठोपाठ एक ८ नागरिकांचे मोबाइल हिसकावले होते.
आरोपी संदेश राजू पटेकर (२२) आणि रवि महिंद्र कालियाना (२३) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडील आयफोन, सॅमसंग, रिअलमी, ओप्पो, रेडमी, विवो अशा विविध ब्रँडचे मोबाइल हस्तगत करण्यात आले. या कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांची प्रभावी कारवाई
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी बजावली. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद ठोंबरे करत आहेत.
अशा प्रकारच्या घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.