छत्रपती संभाजीनगर ( निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ): शहरातील चोरट्यांच्या धाडसाला आळा बसत नाही. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिरामनगरात मंगळवारी (१७ डिसेंबर) आणखी दोन घरे फोडून ३ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. गेल्या महिन्यातील ही २६ वी मोठी चोरी असल्याचे समोर आले आहे.
राजेंद्र सीताराम सानप हे मुलीला भेटण्यासाठी पत्नीसह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. शेजारील प्रशांत मुळे हेही बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी त्यांचेही घर फोडले. दोन्ही घरांमधून सोन्याचे गंठण, चेन, झुबे, चांदीचे फुलपात्रे व रोकड असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे कैद झाले असून, त्याआधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. सानप यांच्या तक्रारीनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.