बीड : दि. २१ बीड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. बीडसाठी पोलीस अधिक्षक म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे.
२०१७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या कावत यांचे मूळ गाव राजस्थान आहे. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांची ओळख आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असलेले अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा नुकतीच झाली. त्यांच्या जागी कोण नियुक्त होणार, याची उत्सुकता होती. विविध नावांची चर्चा होत असताना शासनाने नवनीत कावत यांची निवड केली आहे.
बीड जिल्ह्यासारख्या संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवनीत कावत यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला नक्कीच होईल, अशी अपेक्षा आहे.