छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या एमटीपी किटची विना प्रिस्क्रिप्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुरुवारी (१९ डिसेंबर) अबरार कॉलनीतील आरफत मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करत दोन मेडिकल चालकांसह एका होलसेल डीलरला अटक करण्यात आली. या प्रकरणात शेख जैद पाशा अयुब पाशा (अबरार कॉलनी, सातारा परिसर), संजय पुष्करनाथ कौल (उस्मानपुरा) आणि अभिलाष विजय शर्मा (समर्थनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, आरफत मेडिकल स्टोअर्समध्ये गर्भपात किट सहज उपलब्ध होत असल्याचे समजले. अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक म्हणून दुकानात जाऊन किटची मागणी केली. मेडिकल चालक शेख जैदने किट विना प्रिस्क्रिप्शन खिशातून काढून दिल्यानंतर त्याला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान जैदने किट जाधववाडीतील कौल डिस्ट्रिब्युटर्सकडून आणल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांनी जैदकडून कौलला कॉल करून किटची मागणी करवली. संजय कौलने किट पुरवल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. संजयने चौकशीत वरद गणेश मंदिराजवळील मेडिकलवाला दुकानातील अभिलाष शर्माकडून किट खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यानुसार अभिलाषलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले. तिघांकडेही मोठा साठा सापडला नसला तरी मागणीनुसार किटचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.