छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समाज जीवनात कार्यरत बुद्ध फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना जागृत करून वैचारिक आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी समग्र आंदोलन समजून घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि त्यावेळी व्यक्त केलेले विचार समजून घेणे आवश्यक आहे. आपण सर्वांना ज्ञात आहेच की, 7 व 8 मे 1932 ला नागपूर येथील अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सुत्रे येणे फारच आवश्यक आहे.” त्या विधानाची वर्तमान प्रासंगिकता आणि संदर्भ लक्षात घेऊन सुरूवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या अनुषंगाने संघर्ष केला असला तरी पुढे जाऊन मानवतावादी दृष्टीकोनातून या देशातील द्रविड व नाग लोक एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लढा दिला आहे. याची जाणीव ठेवून त्या संदेशाच्या 92 व्या वर्धापनदिनानिमित्त वर्तमान काळात आपण कुठे आहोत? समग्र चळवळीचे नेतृत्व, कार्यकर्ते, संस्था, संघटना, अनुयायी, हितचिंतक नेमके काय करीत आहेत? आपली त्यात भागीदारी किती? यावर विचारमंथन व्हावे म्हणून नाग लोकांच्या हाती राजकीय सुत्रे येणे फारच आवश्यक आहे. या विषयावर फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल व दि आल इंडिया नाग असोसिएशन (AINA) आईनाच्या संयुक्त विद्यमाने 46 व्या वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे 5 मे 2024 ला आयोजन करण्यात आले होते.*
या कार्यशाळेचे उद्घाटन बहुजन समाज भुषण पुरस्कार प्राप्त उद्धव बनसोडे म्हणाले की, साधा विजेचा दर ठरविण्याचा अधिकार आपणांस असुन सुद्धा टाळूवरील लोणी खाणारे ठरवीत आहेत. न्यायालयातील काही न्यायधीश सुद्धा पूर्वग्रहदूषित भावनेने वागत आहेत. मूलनिवासीयांचे हक्क अधिकार नाकारले जात आहेत. आंबेडकराईट नसलेले प्रतिनिधी निवडल्याने आपली वाताहात झाली आहे. आपली माणसे मोठी झाली की समाजाला विसरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, उच्चाधिका-यांनी आपण ज्या झोपडपट्टीतून आलो, त्या झोपडपट्टीतून लाल दिव्याची गाडी फिरविली पाहिजे. जेणेकरून त्या झोपडपट्टीत राहणा-या जनतेला प्रेरणा मिळेल. आपल्या जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी सत्तेच्या चाब्या आपल्या ताब्यात असायला हव्यात. करिता सत्तेचे गणित समजून घेऊन योग्य प्रतिनिधी निवडले पाहिजेत.
या प्रसंगी धनराज गोंडाणे म्हणाले की, भारताचे संविधान आणि धम्म एकच आहे. करिता त्याची जोपासना करण्यासाठी धम्म पालनाने शीलवान, गुणवान मानसे निर्माण होणे आवश्यक आहे. अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकसित केले पाहिजेत. सुशिक्षितांनी मागे वळून सिंहावलोकन केले पाहिजे. राजू काटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर कोलंबिया विश्वविद्यालयात “The Symbol of Knowledge” अर्थात “ज्ञानाचे प्रतिक” असे लिहिले आहे. ज्यामुळे बराक ओबामा सारख्या महनीय व्यक्ती पुढे आल्यात. महादेव डांबरे म्हणाले की नाग लोकांच्या हाती सत्तेची सुत्रे आल्याशिवाय आपला विकास होणार नाही. भारतातील प्रत्येक नागरिकांच्या अंगी भारतीयता भिनली पाहिजे. काय आपण मूर्ख, नालायक आहोत? ज्यामुळे 4 टक्के शेटजी, भटजी, लाटजी आपल्यावर राज्य करतात. करिता 85 टक्के मूलनिवासी बहुजन समाजाचे ऐक्य झाल्यावर आपली सत्ता असेल. म्हणून एक व्हा, नेक व्हा आणि स्वाभिमानाने एक पक्ष, एक नेता, एक झेंडा हाती घ्या. डॉ. व्ही. एच. कांबळे म्हणाले की, गिळलेला घास आणि घेतलेला श्वास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला आहे. याची जाणीव ठेवून लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस, ही भूमिका पार पाडावी लागेल. सत्ता हेच सर्वस्व नाही तर सामाजिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होऊ शकेल. याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करावे लागेल. प्रा. मंगला झिने म्हणाल्या की, उच्चभ्रू वसाहतीतील लोकांचा सुद्धा सामाजिक कार्यात सहभाग नसतो. आंबेडकराईट व्हायला कुणी तयार नाहीत? निवडणूकीत उमेदवाराचे चारित्र्य, गुणवत्ता तपासून निवड केली पाहिजे. अन्यथा नोटाचा वापर करावा. संघदीप रोडगे म्हणाले की, केवळ राजकीय सुत्रे हाती आल्याने समस्या सुटतील काय? ब्राह्मण समाजातील लोक राजकीय सुत्रे इतरांच्या हातात देऊन राज्यकारभार स्वतः बघतात. इतिहासातून धडा घेतला नाही तर इतिहास आपणास धडा शिकवेल. सत्तेत येण्यासाठी संघटीतपणे शिस्त पाळली पाहिजे. करिता केवळ रक्तातील नव्हे! तर वैचारिक निष्ठावान लोकांची आवश्यकता आहे. नाग लोक हे तुटलेली माणसे आहेत.
प्रमुख वक्ते एड. विजय सुरडकर म्हणाले की, राष्ट्रपती आदिवासी, प्रधानमंत्री ओबीसी आहे. ही माणसे आपली असली तरी त्यांचे मेंदू मात्र आपल्या विचारांचे नाहीत. ज्यामुळे देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींना सुद्धा उद्घाटनाला बोलावले जात नाही. याचे मूळ शोधून सुगरणीचा घरटा तैयार करावा लागेल. शेजारच्या माणसाबरोबर जयभीम बोलायला लाज वाटणारा समाज तैयार होत आहे, ही अधोगती कडे जाणारी वाटचाल होय. सामाजिक व राजकीय चारित्र्य असलेल्या नेतृत्वाचा स्विकार केला पाहिजे.
कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1944 ला मद्रास येथे शासनकर्ती जमात बनने हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा होय असे म्हटले होते. त्यापूर्वी 7 व 8 मे 1932 ला नागपूर येथील अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात “अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सुत्रे येणे फारच आवश्यक आहे.” असे म्हटले होते. त्या विधानाची वर्तमान प्रासंगिकता आणि संदर्भ लक्षात घेऊन सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी संघर्ष केला असला तरी पुढे जाऊन मानवतावादी दृष्टीकोनातून या देशातील द्रविड व नाग लोक एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लढा दिला आहे. याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नाग समुदायाच्या हाती राजकीय सुत्रे येणे फारच आवश्यक आहे. या विषयावर आज आपण वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जेणेकरून समाजाची होत असलेली दुरावस्था आणि नेतृत्वात निर्माण झालेली निर्वात पोकळी याची जाणीव होऊ शकेल. समाजातील वसाहतीतील विहारात आपले योग्य प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव निवडण्यास सक्षम नसणारा समाज विधायिकेत आपले योग्य प्रतिनिधी, आमदार, खासदार निवडून कसे पाठविणार आहे? अशी भिषण परिस्थिती समाजात असल्याने हा विषय ऐरणीवर आणून चर्चा करने गत्यंतर झालेले आहे. मागील महिन्यात फुले आंबेडकर जयंती देशभरात साजरी करण्यात आली. ज्यावर कुंभकर्णीय झोपेतून जागे होणाऱ्या हितचिंतकांनी भावनिकतेपोटी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक चु-हाडा नाचगाणी आणि डी. जे. सह इतर बाबींवर केला आहे. ज्या बळावर योग्य प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे आवश्यक होते. ते न केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजून घेण्याची प्रक्रिया मंदावली असल्याने नेतृत्वहीन समाजात नेतृत्व निर्माण करण्याचा वसा घेतल्याची वल्गना करणारे सुद्धा नेतृत्वहीन झाल्याची जाणीव होत आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे केवळ निवडणुक जिंकल्याने राजकीय पक्षाचे अस्तित्व कायम राहणार नाही, तर जनतेला शिक्षित करून संघटीत होण्यासाठी संघर्ष करायला भाग पाडण्याची प्रक्रिया सातत्याने समाज जीवनात राबवावी लागेल. करिता अनंत नाग, वासुकी नाग, तक्षक नाग, कारकोटम नाग, ऐरावत नाग या सारख्या प्रचारक आणि प्रसारकांची फौज निर्माण करावी लागेल. जेणेकरून नाग समुदायाच्या हाती राजकीय सुत्रे येऊ शकतील. या अनुषंगाने आपण सर्वांनी मार्गक्रमण करावे.
या कार्यशाळेच्या सुरुवातीला स्मृतीशेष पँथरनेते गंगाधर गाडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यशाळेला महादेव डांबरे, एड. विलास रामटेके, डॉ. व्ही. एच. कांबळे, राजू काटोले, धनराज गोंडाणे, एड. विजय सुरडकर, प्रा. मंगला झिने, संघदीप रोडगे, बी. बी. मेश्राम इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने हर्षोल्हासात कार्यशाळेची सांगता झाली.