Nile pratik news network
छत्रपती संभाजीनगर ते अजिंठादरम्यान ७ पुलांचे, ६ ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा महामार्ग गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांत जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा राज्य महामार्ग क्र. ८ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याचे नऊ वर्षांपूर्वी चौपदरीकरण सुरू झाले. मात्र, पहिल्या कंपनीने काम थांबवले. तसेच काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रियेमुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. आजघडीलाही छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीदरम्यान या १०९ किमीमध्ये सात ठिकाणी पुलांचे, तर सहा ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. दरम्यान, या अपूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत.
हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाल्याने नवीन सुधारित महामार्ग होणार, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. परंतु मध्येच पहिल्या कंपनीने काम सोडल्याने हे काम बंद होते. त्यानंतर नवीन आरकेसी कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे काम घेतले. त्यानंतर रस्त्याचे काम चालू झाले, परंतु तरीही या रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे जैसे थे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३२६ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर अजिंठा लेणी, जळगावकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्ता काँक्रिटीकरणातून मजबूत करण्यास मंजुरी दिली गेली. १४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण करण्यासाठी एनएचएआयने (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) सुरुवातीला ३२६ कोटींच्या कामास मंजुरी दिली. तेव्हा हा रस्ता दुपदरी होणार होता. काँक्रिटीकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड (६० किलोमीटर), सिल्लोड ते अजिंठा (४० किलोमीटर) आणि अजिंठा ते जळगाव (४७ किलोमीटर) हे टप्पे पाडले. रस्त्याचे कंत्राट आंध्र प्रदेशच्या लँडप्रो ऋत्विक कन्स्ट्रक्शनने घेतले होते. ही कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आणि रस्त्याचे काम बंद पडले.काँक्रिटीकरण करण्यासाठी तीन टप्पे
तोपर्यंत रस्त्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले होते. यानंतर एनएचएआयची दिल्लीत बैठक झाली आणि देशात ज्या ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट राहिली. तेथील कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करून नवीन कंत्राटदार नेमण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणी या १०९ किलोमीटर अंतरात अद्यापही हे काम अपूर्ण आहेत. फुलंब्री तालुक्यामध्ये चौका घाटात पुलाचे व रस्त्याचे काम अपूर्ण, बिल्डा फाटा मठ पाटीजवळील पूल अपूर्ण, आड नदीवरील पूल अपूर्ण, महालकिन्होळा येथील पूल व पाचशे मीटर रस्ता अपूर्ण, सिल्लोड तालुक्यामध्ये केहऱ्हाळा फाट्यासमोरील पूल अपूर्ण, चिंचखेडा माणिकनगरमधील पूर्णा नदीवरील पूल व तीनशे मीटर रस्ता अपूर्ण, तर माणिकनगर, सिल्लोड शहर डोंगरगाव फाटा पाच किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तसेच पालोद गावाजवळ पुलाचे काम अपूर्ण, (गोल टेक) बाळापूर फाटा येथे एक किमी रस्ता अपूर्ण, तर अजिंठा गावाजवळ पूल व पाचशे मीटर रस्ता पूर्ण असे या १०९ किलोमीटर अंतरावर जवळपास सात पुलांचे व सहा ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे.