छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क):जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य इमारतीचे उद्घाटन २६ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद प्रशासन या कार्यक्रमासाठी तयारी करत आहे. नव्या इमारतीत विखुरलेले सर्व प्रशासकीय विभाग एकत्र आल्यामुळे नागरिकांसाठी सोयीस्कर सेवा उपलब्ध होणार आहेत.
ही नवीन इमारत छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा परिसरात उभारण्यात आली आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे कार्यालय निजामकालीन जीर्ण इमारतीत होते. २००१ पासून नवीन इमारतीची मागणी होत होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात कोनशिला समारंभ पार पडला होता, तर १७ सप्टेंबर २०२१ रोजी या इमारतीचे भूमिपूजन झाले होते.
इमारतीची रचना व विभागवार सुविधांचे विवरण
तळमजला (१८,५३८ चौरस फूट): अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापती यांची कार्यालये तसेच स्थायी समिती हॉल, स्वच्छतागृहे व गोदाम.
पहिला मजला (१९,९२६ चौरस फूट): आरोग्य, वित्त, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम, सर्व शिक्षा अभियान यांची कार्यालये.
दुसरा मजला (१८,९८९ चौरस फूट): मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्यालये, बैठक हॉल, कृषी व पंचायत विभाग.
तिसरा मजला (१९,७३१ चौरस फूट): स्वच्छ भारत मिशन, रोहयो, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन कार्यालये.
ही इमारत नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून विविध विभाग एकाच ठिकाणी एकत्र आल्याने कामकाज अधिक गतिमान होणार आहे.