पुणे (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) : पुण्यावरून महाडला लग्नासाठी जात असलेल्या वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटातील तीव्र वळणावर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत, यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हा अपघात आज (२० डिसेंबर) सकाळी दहाच्या सुमारास कोंडेथर गावाच्या हद्दीत वॉटरफॉल पॉईंटजवळ घडला.
जाधव कुटुंबीय महाडमधील बिरवाडीकडे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन खासगी बसने (एमएच १४ जीयू ३४०५) जात होते. चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली आणि या भीषण अपघातात संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव आणि एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताम्हिणी घाट हा पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगावला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.