गंगापूरमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृत्यूगंगापूर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) : मित्राच्या नव्या मोटारसायकलची चक्कर मारताना झालेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (१९ डिसेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गंगापूर-लासूर मार्गावरील बुट्टेवाडगाव शिवारात ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव नीलेश खंडू शिंदे (वय २५, रा. शेकटा, ता. गंगापूर) असे आहे.
नीलेशच्या मित्राने दोन दिवसांपूर्वी नवीन मोटारसायकल (क्र. एमएच ०४ एचटी ००७९) घेतली होती. त्या मोटारसायकलची चाचणी घेण्यासाठी नीलेश शेकटा येथून बुट्टेवाडगावच्या दिशेने गेला. मात्र खेडकर यांच्या शिवाराजवळ मोटारसायकल घसरल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नीलेशच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.