चौकशी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
छत्रपती संभाजी नगर :दि. २० देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत भारतीय क्रांती दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान अमित शहा यांचा फोटो आणि प्रतिमा जाळून संताप व्यक्त करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधाते आणि राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या संविधानामुळेच देशाचा कारभार आज व्यवस्थित सुरू आहे. मात्र, अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेबांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. यावर भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई शैलेंद्र मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला.
राष्ट्रपतींकडे मागणी:
आंदोलकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अमित शहा यांचा गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा घेण्याची आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, त्यांना संसदेबाहेर काढून सार्वजनिक पदे भूषवण्यास अयोग्य ठरवावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
उपस्थित मान्यवर:
आंदोलनाच्या वेळी भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ, रमेश दादा साळवे, मच्छिंद्रनाथ ढेपे, रामदास मगरे, सय्यद अहमद, अजीम पटेल, विजय मोकळे, विक्रम जावळे, गणेश निंबोरे, किरण तुपे, कपिल गायकवाड, अनिल दामोदर, सुनील साळवे, अलीम शेख, अमोल निकाळजे, शेख इलियास आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय क्रांती दलाच्या वतीने असा इशारा देण्यात आला की, अमित शहा यांना देशामध्ये कुठेही फिरू दिले जाणार नाही. बाबासाहेबांविषयी अपशब्द काढणाऱ्यांनी आधी पद सोडावे आणि मगच वादग्रस्त वक्तव्य करावे, असेही आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले.