छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतीक न्यूज नेटवर्क):गुरुवार, सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर अचानक थरारक प्रसंग निर्माण झाला. क्यूआरटी पथकाचे पोलीस हातात बंदुका घेऊन बसस्थानकावर वेगाने दाखल झाले. त्यांनी संपूर्ण बसस्थानकाची कसून तपासणी केली आणि अखेर दोन संशयितांना सिनेस्टाइल घेराव घालून ताब्यात घेतले.
हा प्रकार पाहून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, काही वेळाने पोलिसांनी खुलासा केला की हे सर्व मॉक ड्रिल (प्रात्यक्षिक) होते. आपत्तीजनक परिस्थितीत यंत्रणा किती तत्पर आहे, हे तपासण्यासाठी ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.
या मोहिमेत बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथकानेही सहभाग घेतला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकत या उपक्रमाचे कौतुक केले.