छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क):
एमजीएम संस्थेच्या इमारतीवर सोलार पॅनल स्वच्छ करताना बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी मोठा अपघात घडला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पाय घसरल्याने वडील आणि मुलगा खाली कोसळले. या दुर्घटनेत वडील अजय सोमनाथ गायकवाड (वय ५०, रा. भानुदासनगर, आकाशवाणी) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा शरद अजय गायकवाड (वय १८) गंभीर जखमी झाला आहे.
अजय गायकवाड एमजीएममध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. मुलासोबत सोलार पॅनल साफ करताना पाय घसरल्याने दोघे खाली पडले. गंभीर दुखापतीमुळे अजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. शरद याला तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाची नोंद सिडको पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार भालेराव करत आहेत.