पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची, पत्रकार संघटनेची आयुक्ताकडे मागणी.
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ जालना जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे साप्ताहिक उन्नती पत्राचे संपादक बाजीराव भानुदास सोनवणे यांना धमकावल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. संपादकांनी पोलीस आयुक्तांना याबाबत तक्रार देत आरोपीविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेचा तपशील असा आहे कि, संपादक बाजीराव सोनवणे यांनी आपल्या साप्ताहिकात सुंदर वाघमारे यांच्या भ्रष्टाचाराविषयीची बातमी छापली होती. दिनांक १७ डिसेंबर रोजी, दुपारी १ वाजता, मृद व जलसंधारण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यालयात सदर वर्तमानपत्र वाटप करत असताना वाघमारे यांनी त्यांना गाठले. कोणतीही चर्चा न करता वाघमारे यांनी त्यांना “माझ्या विरोधात बातमी छापलीस आणि पेपर वाटायला आलास?” असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर “तुझे हात-पाय तोडतो, डोळे फोडतो,” अशी धमकी देत शारीरिक मारहाण केली, पुढे बातमी छापल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
संपादक सोनवणे यांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण आणि ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाघमारे यांनी आपल्या गैरकारभाराचे पुरावे उघड होऊ नयेत म्हणून ही धमकी दिली आहे. संपादकांनी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी वाघमारे यांच्या गैरकारभाराविरोधात जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सदर घटना उपोषणस्थळी घडल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध संपादक संघटनांनी घटनेचा तीव्र निषेध केला असून प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण गंभीर बनले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर, रतनकुमार साळवे, रामेश्वर दरेकर, बाजीराव सोनेने, बबन सोनेने, राज ठाकरे, दिनेश परदेशीं, प्रवीण बोरुडे, प्रमोदकुमार, शेख शफिक, अजमत पठाण, फिरोज शेख, काजी नजीमोद्दीन, विलास साळवे, फिरोजखान, अंबादास तळणकर, नितीन दांडगे, सुनील खराबे,आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.