छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात एमआयएमचे पराभूत उमेदवार इम्तियाज जलील यांनी आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार केली होती. या तक्रारीसाठी सादर करण्यात आलेल्या व्हिडीओतून आचारसंहितेचे उल्लंघन स्पष्टपणे दिसत नसल्याचा अहवाल आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
जलील यांनी मतदानाच्या दिवशी आधार कार्ड जमा करून पैसे वाटप व बोटाला शाई लावून मतदान रद्द केल्याच्या घटनांचा आरोप केला होता. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, गुन्हे विभागाचे उपायुक्त प्रशांत स्वामी आणि निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांच्या समितीने तपास केला.
सादर केलेल्या अहवालानुसार, व्हिडीओतील पुरावे स्पष्ट नसले तरी चौकशी पुढे चालू ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल नुकताच सुपूर्द करण्यात आला आहे.