छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क): सेव्हन हिल उड्डाणपुलावर मंगळवारी (१७ डिसेंबर) रात्री ८:३० च्या सुमारास साखळी अपघात झाला. एका सुसाट वेगाने जाणाऱ्या कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील ४ कार आणि १ दुचाकी एकमेकांवर धडकल्या.
सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. उच्च न्यायालयाच्या दिशेने जात असताना या गाड्यांचा अपघात झाला. आकाशवाणीच्या दिशेने जाणाऱ्या वेगवान कारने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांचा ताळमेळ बिघडला आणि हा अपघात घडला. ब्रेक दाबणारा कारचालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
या अपघातामुळे ५ वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पुलावर काही वेळ वाहतूककोंडी झाली. सेव्हन हिल चौकातील वाहतूक पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. पुंडलिकनगर पोलिसांनी सर्व वाहने पोलीस ठाण्यात नेण्याचा आदेश दिला असला तरी वाहनधारक आपसात वाद मिटविण्याचा प्रयत्न करत होते.