छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क ):परभणीतील पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूविरोधात छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवारी (१६ डिसेंबर) आक्रोश व्यक्त करण्यात आला. क्रांती चौकात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने, रास्ता रोको आंदोलन केले आणि टायर जाळून निषेध नोंदवला. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी थेट कुटुंबीयांना कळवण्यात आल्याने संतप्त कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. महात्मा फुले पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करून कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जमून घोषणाबाजी केली.
अनेक जखमांमुळे सोमनाथचा मृत्यू – प्राथमिक अहवालशासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे सोमवारी सकाळी ८ वाजता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन ६ डॉक्टरांच्या पथकाने केले. प्राथमिक अहवालानुसार अनेक जखमांमुळे शॉकमध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह परभणीस रवाना करण्यात आला.
आई विजयाबाईंची मागणी : दोषींवर कारवाई करासोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत, अटक केल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देणे ही गंभीर चूक असल्याचे सांगितले. “माझ्या मुलाला मारहाण का करण्यात आली याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली
तणावात बंद आणि आंदोलनआंबेडकरी कार्यकर्त्यांनी शहरभर बंदचे आवाहन केले. महात्मा फुले पुतळा आणि क्रांती चौकात निदर्शने करून रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात आंबेडकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचा मोठा सहभाग होता.
महापालिकेच्या माध्यमातून सरकारला ७ मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
शहरातील बंद आणि निषेध आंदोलनामुळे काहीकाळ शहरात तणावाचे वातावरण होते.