निळे प्रतिक न्यूज नेटवर्क परभणी, दि. १६ डिसेंबर – परभणीच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या लोकनेते विजय दादा वाकोडे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. परभणीतील रसाळ हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ.गोविंद रसाळ यांनी अधिकृतरित्या ही बातमी जाहीर करत त्यांच्या निधनाची दु:खद माहिती दिली. विजय दादा वाकोडे यांच्या निधनाने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारासाठी त्यांनी आपले जीवन वाहिले होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक प्रकल्प आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
वाकोडे दादांचे निधन ही परभणीतील सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. त्यांच्या आठवणी कायमच प्रेरणा देणाऱ्या राहतील. त्यांच्या कार्याचा आदर राखत अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आणि त्यांच्या सहवासातील असंख्य व्यक्तींनी या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
परभणीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळांत हळहळ
विजय दादा वाकोडे यांचे निधन ऐकताच परभणीतील त्यांच्या चाहत्यांसह समाजातील विविध घटकांमध्ये शोककळा पसरली आहे.चळवळीतील या अनमोल हिर्याच्या स्मृतींना आदरांजली वाहत आपण त्यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार करूया.