छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क ):परभणीत पोलिस कोठडीत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी आज, १६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर बंदची हाक दिली आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या बंदला राज्यातील विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांचा पाठिंबा आहे.
आंबेडकरी संघटनांचा एकजूट पाठिंबा
या बंदला रिपब्लिकन सेना, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पक्ष, भीमशक्ती सामाजिक संघटना, आझाद समाज पार्टी, भीमआर्मी, संविधान बचाव आघाडी यांसह इतर अनेक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.
बंद शांततेत होणार, सहकार्याचे आवाहन
बंद शांततेत पार पाडण्यासाठी व्यापारी, वाहनचालक, आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आंबेडकरी नेत्यांनी केले आहे. बंददरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून कार्यकर्त्यांकडून दक्षता घेतली जाणार आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू: कुटुंबीय आणि नेत्यांचा आक्रोश
सोमनाथ सूर्यवंशी (वय ३६, रा. भोसरी, पुणे) यांचा मृतदेह रविवारी रात्री घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत तपासणी लांबली असून, मृतदेहावर प्राथमिक तपासणीसाठी सीटी स्कॅन करण्यात आले. मृत्यूच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंबेडकरी नेते आणि समर्थकांनी घाटी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली.
नेत्यांचा आरोप
प्रा. अनिल कांबळे यांनी दावा केला की, “सोमनाथ यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे. शरीरावर जखमा असून त्याचा पाठलाग केला गेला.” सोमनाथ पुण्यातून लॉच्या शिक्षणासाठी परभणीत आले होते. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकत नसल्याने नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
संपूर्ण प्रदेशात तणावाचे वातावरण
या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात बंद पुकारण्यात आला असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वसामान्यांनी बंदला पाठिंबा देत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.