निळे प्रतीक न्यूज नेटवर्क.
छत्रपती संभाजी नगर : दी.१६ परभणी जिल्ह्यातील रहिवासी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) आज सकाळपासून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुरू झाले आहे. सहा जणांच्या विशेष समितीच्या देखरेखीखाली इन-कॅमेरा पद्धतीने हे पोस्टमार्टम होत असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित होते.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी सकाळी सात वाजता औरंगाबाद येथे पोहोचून पोस्टमार्टम प्रक्रियेबाबत माहिती घेतली. मात्र, कुटुंबीयांना औरंगाबाद येथे पोहोचण्यास विलंब का झाला? यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांवर दबावाचा आरोप
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या मते, पोलिसांनी त्यांना परभणी येथील विश्रामगृहात मध्यरात्री एक वाजता चर्चेसाठी बोलावले. तिथे कुटुंबीयांवर जबरदस्त दबाव आणून परिस्थिती मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल एक तास चाललेल्या चर्चेनंतर कुटुंबीयांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि पहाटे औरंगाबादसाठी रवाना झाले.
ही महत्त्वाची माहिती सोमनाथ यांचे लहान भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी फोनवरून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांवर प्रशासनाकडून सतत दबाव टाकला जात आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.
अंत्यसंस्कार परभणी येथे
पोस्टमार्टम झाल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचे पार्थिव परभणीला नेण्यात येईल आणि दुपारी त्यांच्या गावात अंत्यसंस्कार केले जातील.
निष्पक्ष चौकशीची मागणी
सूर्यवंशी कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सत्य बाहेर येण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची भावना निर्माण झाली असून, न्याय मिळवण्यासाठी दबाव वाढत आहे.