छत्रपती संभाजीनगर :- धुक्यामुळे चालकाला रस्त्यावर उभा असलेला कंटेनर दिसला नाही, आणि भरधाव एसटी बसने त्याला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात महिला वाहकासह ६ प्रवासी जखमी झाले असून, बाजीगर अशोक गायकवाड (२५, रा. शहानगर) यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर सटाणा फाट्याजवळ आज, ६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
अपघातामुळे रस्त्यावर गोंधळ उडाल्याने एका कारने अचानक ब्रेक मारला, ज्यामुळे तिच्या मागे आलेल्या तीन कार एकमेकांवर धडकल्या. या चारही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत.
जखमींची नावे:1. बाजीगर अशोक गायकवाड (२५, रा. शहानगर)2. प्रिया अशोक गायकवाड (३५, रा. शहानगर)3. जिजाबाई अशोक गायकवाड (५०, रा. शहानगर)4. हमीद अब्दुल चाऊस (३२, रा. हर्मूल)5. समीर हमीद चाऊस (२०, रा. हर्मूल)6. महिला वाहक सोनाली बागडे (३५)
कसा झाला अपघात?
अवकाळी पावसामुळे पसरलेल्या धुक्यामुळे रस्त्यावर दृश्यता कमी होती. करमाडजवळ सटाणा फाट्याजवळ कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता. भरधाव एसटी बसने तो लक्षात न आल्याने मागून जोरदार धडक दिली. अपघाताचा आवाज ऐकून सटाणा गावातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परिस्थिती:
अपघातामुळे एसटी बसची समोरील बाजू पूर्णपणे चिरडली गेली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.