छत्रपती संभाजीनगर – महिलांचे मंगळसूत्र हिसकावून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार अमोल वैजिनाथ गलाटे आणि त्याचा साथीदार मंगेश वाल्मिक शहाणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल आणि 9 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यांचा तपशील
जवाहरनगर पोलीस ठाण्यातील फिर्यादी मिनल यतिंद्र देशपांडे (वय 38, रा. देशमुख नगर) यांनी तक्रार दाखल केली होती की, दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता, गोल्डन केअर हॉस्पिटलसमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना डायल-112 मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
डायल-112 मार्शल मारोती गोरे यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी अमोल गलाटे हा आपल्या आईला भेटण्यासाठी जालना येथे येणार असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक त्वरित रवाना झाले. जालना येथे आरोपी अमोल गलाटेला ताब्यात घेऊन, न्यायालयीन आदेशाने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे आणले.
गुन्ह्यांची कबुली आणि मुद्देमाल जप्त
तपासादरम्यान, आरोपींनी मागील 12 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली. CCTV फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने जप्त केले असून, एकूण मुद्देमालाची किंमत ₹9,65,000 इतकी आहे.
पोलीस आयुक्तालयाची प्रशंसा
सदर कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त नवनीत कॉवत (IPS), सहाय्यक पोलीस आयुक्त रंजीत पाटील, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मारोती खिल्लारे, गजेंद्र शिंगाणे, ज्ञानेश्वर शेलार आणि त्यांच्या टीमने केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाची पावले उचलली गेली आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे पाऊल
या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.