एस.एम. हायस्कूल, कणकवलीच्या 1976 च्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी 6, 7, आणि 8 डिसेंबरला महाड येथे आयोजित गेट-टुगेदरसाठी एकत्र येणार आहेत. या बहुप्रतीक्षित स्नेहमेळाव्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे, आणि सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मनात या भेटीबाबत प्रचंड उत्सुकता आणि आनंद आहे.
या तीन दिवसीय गेट-टुगेदरचे नियोजन महाडचे माजी विद्यार्थी उन्मेष राजेशिर्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गेट-टुगेदर होत असले तरी यावेळचे आयोजन खास ठरणार आहे. या कार्यक्रमात महाडमधील प्रेक्षणीय स्थळांची सफर, रायगड रोपवेची अनुभूती, गप्पा, आठवणी, आणि मौजमजेमुळे माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.
कणकवलीहून संजय पाध्ये आणि नंदू आळवे तर मुंबईहून डॉ. संदीप कदम आणि ए. व्ही. चिंदरकर या गेट-टुगेदरच्या तयारीत सक्रिय आहेत. महाड येथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची आणि पाहुणचाराची काळजी घेतली जात आहे.
“49 वर्षांनंतर पुन्हा भेटण्याचा आनंद वेगळाच आहे,” असे उत्साहाने माजी विद्यार्थी सांगत आहेत. नव्याने सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती यंदाच्या स्नेहमेळाव्याला खास बनवेल.
उन्मेष राजेशिर्के यांनी या संपूर्ण गेट-टुगेदरचे नियोजन केले असून, “चलो महाड!” असा संदेश देत सर्व माजी विद्यार्थी एकत्र होण्यास आतुर आहेत.