पनवेल तालुक्यातील न्हावा गावात पाण्यावरून दलित महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घोटभर पाण्यासाठी अपमान सहन करावा लागला होता, त्याच पनवेल परिसरात पुन्हा अशी घटना घडल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
सवर्ण सत्यवान पाटील, सचिन पाटील आणि त्यांच्या परिवारातील महिलांनी सौ. जनाबाई पगारे व त्यांची मुलगी अमिषा पगारे यांना पिण्याच्या पाण्यासाठी अमानुष मारहाण केली. यात पगारे आई-मुलगी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची मागणी
या घटनेनंतर विविध आंबेडकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर मोठे आंदोलन छेडले. त्यामध्ये उरण आणि पनवेल येथील रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी उर्वरित दोषींना तत्काळ अटक करून अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सध्या पोलिसांनी एकाच आरोपीला अटक केली आहे. मात्र, इतर आरोपींना अटक न झाल्यामुळे संतप्त लोकांनी संविधान चौक कृती समितीच्या नेतृत्वाखाली परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात सहभागी प्रमुख कार्यकर्ते आणि संघटना:
वनिता बर्फी (लॉर्ड बुद्धा चॅनल प्रतिनिधी)
सचिन गवळे
प्रा. भोसले
मधुकर रगडे
बहुजन बौद्ध संघटनेचे अशोक जाधव
सत्यशील कांबळे
सतीश गायकवाड
मिथुन कांबळे
न्हावा गावातील लोकांची मागणी
न्हावा गावातील जनतेची एकमुखी मागणी आहे की दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा.
प्रतिनिधी: आनंद म्हस्के (8652325032)
(वरील बातमी तयार करताना पीडित परिवाराचा आवाज आणि घटनेची तटस्थ माहिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.)