मुंबई :प्रत्येक वर्षी १ जानेवारीला भीमा- कोरगाव (पेरणे) येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देश-विदेशातून लाखों आंबेडकरी अनुयायी येतात. या अनुयायांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकाऱ्यांची एक कायमस्वरूपी समिती नेमली असून ही समिती शौर्य दिनाचे नियोजन करते. या शौर्य दिनासाठी करोडो रुपयांचा निधी शासनामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बार्टी) निधी वापरला जातो. पण हा निधी केवळ कागदावरच वापरला जातो हा निधी प्रत्यक्ष वापरला जात नाही असे अनेक आंबेडकरी अनुयायांचे व संस्था आणि संघटनाचे मत असून प्रत्येक वर्षी १ जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायांचे जे हाल होतात ते शौर्य दिनाच्या कार्यक्रमानंतर त्यांचा संताप दिसून येतो. याही वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी लाखों आंबेडकरी अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. त्यांना कोणत्याही सोयी सुविधांची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक वर्षाप्रमाणे भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी मुख्यमंत्री यांना एक निवेदन दिले असून त्या निवेदनात त्यांनी अनेक सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली असून त्यात प्रामुख्याने
१) संपूर्ण विजयस्तंभास फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात यावी.
२) पोलीस सुरक्षा व्यवस्था तसेच आंबेडकरी अनुयायांना रांगेतून सोडण्यासाठी पोलिस अथवा होमगार्ड (स्त्री-पुरुष) यांची व्यवस्था करावी.
३) पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, विजयस्तंभ परिसरात विद्युत रोषणाई व गर्दीचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी उंच माईकसह मनोरे, सी.सी. टिव्ही, पार्किंग व्यवस्था जयस्तंभाच्या जवळपास असणाऱ्या मोकळ्या जागेत करण्यात यावी जेणेकरून महिला, लहान बालके, अपंग व वृद्धांना सोयिस्कर पडेल.
४) भीमा-कोरेगाव विजयस्तंभाऊच्या मालकीच्या परिसरातील ३.८६ आर जागेत पुस्तकांचे स्टॉल, प्रबोधनपर साहित्य व समाजप्रबोधन करणारे स्टॉल इ. सर्व व्यवस्था मोफत करण्यात यावी.
५) भीमा-कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील जागेत ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारावीत.
६) पुणे व शिक्रापूर ते पेरणे (भीमा कोरेगाव) व पेरणे (भीमा कोरेगाव) ते पुणे व शिक्रापूर (दर पाच मिनीटांनी) पुणे कॉर्पोरेशन परिवहन बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवा प्रत्येक पाच मिनिटाला चालू ठेवावी वरील सोयी सुविधा महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात याव्यात व यासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद करावी किंवा शौर्य दिनानिमित्त होणारा खर्चाचा स्वतंत्र निधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेला अतिरिक्त देण्यात यावा तसेच पार्किंग ही मोठी समस्या असून पार्किंगची व्यवस्था विजयस्तंभापासून खूप लांब ठेवीत असल्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग, मुले,व स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. अनेक वेळा जिल्हाधिकारी यांच्यासमोर ही बाब आणूनही जिल्हा प्रशासन काहीच कार्यवाही करीत नाही. भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथील शौर्य दिनासाठी मंजूर निधी काटेकोरपणे वापरण्यात यावा व आंबेडकरी अनुयायांना सर्व सोयी सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी भीमा कोरेगाव विजयसांभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.