डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६डिसेंबर रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. त्यासाठी संपूर्ण देशभरातून बहुजन समाज 4 डिसेंबरपासूनच मुंबईकडे प्रस्थान करतो. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी समारंभ ५ डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे आयोजित केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत.
या तारखेची निवड जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेने केला आहे. एका बाजूला संपूर्ण बहुजन समाज आपल्या महामानवाच्या आठवणीने शोकाकूल असतो, तर दुसरीकडे नव्या सरकारचा जल्लोष होणे हा संवेदनशीलतेचा अभाव असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
तारीख बदलावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
ऑल इंडिया पँथर सेनेने महायुती सरकारवर समाजकंटकीय कृत्याचा आरोप लावत 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीचा तात्काळ पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. “राज्यपालांनी हा समारंभ 3 डिसेंबरपूर्वी आयोजित करावा, जेणेकरून चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांच्या व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही,” असे स्पष्ट मत सेनेने नोंदवले आहे.
या प्रकरणामागे आरएसएसचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही तारीख जाणीवपूर्वक निवडून डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत पँथर सेनेने या असंवेदनशील निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे.
“समाजाच्या भावना दुखावल्यास परिणाम भोगावे लागतील”
पँथर सेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, महायुती सरकारने आपले धोरण तात्काळ बदलावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. “आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. आम्ही अन्याय सहन करणार नाही,” असे पँथर सेनेने जाहीर केले.
संवेदनशीलतेची अपेक्षा
सर्वसामान्य आंबेडकरी अनुयायांसाठी महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाला शोकभावनेत सामील होण्याचा हा काळ असतो. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने संवेदनशीलता दाखवत, शपथविधीची तारीख तात्काळ बदलून समाजातील भावनांचा आदर करावा, अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे.