सहा डिसेंबर हा दुःखाचा दिवस आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने जनता चैत्यभूमीवर येते व आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करते. दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच आहे. या जनतेला कोणीही आमंत्रण देत नाही. ती स्वयंप्रेरणेने येते व स्वयंशिस्तीने जाते.
तथापि , लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर आलेल्या या जनतेने महापरिनिर्वाण दिनी गांभीर्याने व शांततेने वागावे , अशी अपेक्षा असते. आपल्या घरात कोणाचे मयत झाल्यास आपण दुःखमग्न असतो. घरात कशाला , अगदी शेजारीपाजारी जरी कोणाचा मृत्यू झाला तरी आपण गंभीर होतो , नेहमीची कामे बाजूला ठेवून आपले दुःख व्यक्त करतो , संबंधित कुटुंबांना शक्य होईल तितकी मदत करतो. टीव्ही बंद करून ठेवतो. आपल्या घरी वा शेजारी पाजारी मयत झाल्यावर अशा मानवतेने वागणारे आम्ही आंबेडकरवादी , या समाजाचाच नव्हे तर अवघ्या देशाचा बाप असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कसे वागतो ? या दिवशी चैत्यभूमी व परिसरात कसे वातावरण असते ? हे आमचे वागणे सार्वजनिक सभ्यतेला धरून असते काय ? एक आंबेडकरवादी म्हणून आपल्या या वागण्याचा अंतर्मुख होऊन आपण कधी विचार करणार आहोत ?
महापरिनिर्वाण दिनाच्या दुःखद प्रसंगी बिदाग्या घेऊन गाणी गाणारे काही सन्माननीय गायक कलावंत चैत्यभूमीवर आपल्या गाण्याच्या कॅसेट्स- सीडीज विकायला बसत असत आणि “धंदा” चांगला व्हावा म्हणून अक्षरक्षः कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात आपल्या गायनकलेचा बाजार मांडत असत. सहा डिसेंबर हा दुःखाचा दिवस आहे, हा दिवस गांभीर्याने पाळायला हवा , या दिवसाचे गांभीर्य नष्ट होईल , असे कोणतेही दुष्कृत्य आपण करायला नको , याचे भान समाजाला दिशा देण्याची क्षमता असणाऱ्या या सन्माननीय गायक कलाकारांनी सोडून दिले होते. त्यामुळे अज्ञ जनता देखील यांत वहावत चालली होती. या सगळ्या प्रकारांमुळे परमपूज्य बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य नष्ट होत आहे , हे अनेकांना समजत होते. परंतु हे थांबवावे कसे ?
हे असे शरमास्पद प्रकार थांबविण्यासाठी “शांत चैत्यभूमी अभियान” सुरू करण्यात आले. २०१५ साली हाताच्या बोटावर मोजणाऱ्या महिला यांत सामील झाल्या. या महिलांनी शांतताभंग करणाऱ्यांना ‘आजचा दिवस दुःखाचा आहे , कृपया शांतता राखा’ , अशी विनंती केली. काहींना या विनंतीमुळे भान आले तर काहींनी यांकडे दुर्लक्ष केले. काहींनी वाद घातला तर काहींनी अवमान केला. तरीही या महिलांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. त्या जागोजागी जाऊन अशी विनंती करीतच राहिल्या. मग काही जण महिला आल्यावर त्यांच्यासमोर तात्पुरता आवाज कमी करीत व महिला गेल्यानंतर पुन्हा आवाज वाढवण्याची चलाखी करीत असत. म्हणजे महापरिनिर्वाण दिन हा दुःखद प्रसंग आहे ,हे लक्षात आणून दिले तरी ही मंडळी आपला धंदेवाईकपणा सोडायला तयार नसत ! अशा स्वार्थांध नराधमांना आपण कोणत्या अर्थाने आंबेडकरवादी म्हणणार आहोत ?
यांवर उपाय म्हणून दुसऱ्या वर्षी नियोजन करून सुमारे ५०० महिलांची “शांत चैत्यभूमी अभियान” राबवण्यासाठी नोंदणी केली. दादर येथील छबिलदास शाळेतील वर्ग भाड्याने घेऊन या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर अभियानासाठी लागणारे बॅनर्स , प्लाय कार्ड्स तयार केले. शिवाजी पार्क येथे स्टॅाल घेतला. सहभागी महिलांना भोजन - चहापाणी, त्यासाठी लागणारा निधी अशी सगळी व्यवस्था पुरुष कार्यकर्त्यांनी केली. मग पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या या प्रशिक्षित महिला हातात शांततेचे फलक घेऊन महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क परिसरात “शांतता फेरी” काढू लागल्या आणि शांतताभंग करणाऱ्यांना ‘महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य पाळा’ अशी नम्र विनंती करू लागल्या. हा दुःखाचा दिवस असून या दिवसाचे पावित्र्य जपायला हवे , असे सांगू लागल्या. आजूबाजूला असणाऱ्या जनतेने देखील या महिलांना साथ दिली. त्यानंतर थातुरमातुर विरोध करीत महापरिनिर्वाण दिनी “गायन कलेचा धंदा करणाऱ्या” सन्माननीय गायक- कलावंतांना माघार घ्यावी लागली व या प्रकाराला आळा बसला. आज शिवाजी पार्क परिसरात सीडी विकण्यासाठी मोठ्या आवाजात कर्कश गोंगाट करणाऱ्या गायकांचे गायन बंद झाले आहे. हे “शांत चैत्यभूमी अभियानाचे” दुःखद यश आहे. दुःखद यांसाठी की सगळ्या जगाला अक्कल शिकवण्यास एका पायावर तयार असणाऱ्या या आंबेडकरी अनुयायांना महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य समजावून सांगावे लागते आहे ! समाजाला दिशा देण्याची क्षमता असणाऱ्या सृजनशील गायक कलाकारांचे हे अवमूल्यन दुःखद नाही काय ?
यानंतर काही गायक मंडळींनी राजकीय मंचांचा आसरा घेतला. काही गायक कलावंत तर जो बिदागी देईल त्याच्या मंचावर जातात व त्या मोबदल्यात कर्णकर्कश डीजे वगैरे वापरून गाणी गातात व सगळ्या परिसरात कानठळ्या बसविणारा आवाज पसरवतात. आपल्या घरात कोणाचे मयत झाल्यावर ही गायक - कलावंत मंडळी अशाच पद्धतीने वागतात काय ? आपल्या अशा वागण्यामुळे आपल्याच उद्धारकर्त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य नष्ट होते , हे या सन्माननीय गायक कलावंतांना अजूनही का कळत नाही ?
मागील वर्षी सहा डिसेंबर २०२३ रोजी आपण काय अनुभवले ? माजी नगरसेवक कालवश मनोज संसारे यांचे सन्माननीय सुपुत्र यांनी शिवाजी पार्कवर भोजनासाठी स्टॅाल टाकला होता व बाजूलाच वेगळा मंच उभारून तिथे पाच डिसेंबर पासूनच भेसूर कर्णकर्कश आवाजात गाणी गायली जात होती. असाच प्रकार सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या मंचावरून सहा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपासून सुरू होता. सन्माननीय प्रकाश गजभिये नावाचे एक आमदार आहेत. त्यांच्या पक्षाच्या मंचावरून देखील पाच डिसेंबर पासूनच मोठ्या आवाजात गाणी- कवाल्या वाजवल्या जात होत्या. सहा डिसेंबर रोजी तिथे आनंद शिंदे नावाचे गायक अशाच कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात गाणी म्हणत लोकांना नाचायला प्रवृत्त करीत होते. सहा डिसेंबर हा नाचायचा दिवस आहे काय ? कोणी तरी बिदागी देतेय म्हणून असे वागायचे असते काय ? आज याने बिदागी दिली तर याच्या मंचावर जाऊन गाणी म्हणायची , उद्या त्याने बिदागी दिली तर त्याच्या मंचावर जाऊन गाणी म्हणायची ; याला आंबेडकरवाद म्हणतात काय ? जसे एखादे विकाऊ जनावर या मालकाच्या गोठ्यातून त्या मालकाच्या गोठ्यात जाते तसे बिदागीच्या हव्यासापोटी वागणारे हे कलावंत गायक या मंचावरून त्या मंचावर जातात व घसे खरडून झाल्यावर निर्लज्जपणे ‘आम्ही आंबेडकरवादी’ असल्याचा टेंभा देखील मिरवतात. असे विकाऊ गायक कलावंत कोणत्या अर्थाने आंबेडकरवादी आहेत ?
हे सगळे सांगायला फार आनंद होतो आहे , अशातला भाग नाही. हे मांडताना अतिशय वेदना होत आहेत. परंतु आज ना उद्या हे कोणाला तरी सांगावेच लागणार आहे. “आपला माणूस आहे , सांभाळून घ्या” हे एका ठराविक मर्यादेपर्यंत ठिक आहे. तथापि, घरात मयत झाले आहे आणि आपलाच माणूस ढोलकीच्या तालावर कानठळ्या बसवणारा डीजे लावून थयथया नाचत असेल तर त्याला थांबवायला नको काय ? कि , “आपला माणूस” आहे म्हणून अशा दुःखद प्रसंगी आपणही त्याच्यासोबत धांगडधिंगाणा घालायचा ? खरे तर आपला माणूस आहे म्हणूनच आपण सर्वांनी त्याला शाब्दिक स्तरावर हे सगळे समजावून सांगण्याचे प्रयत्न करायला हवेत. “दुसरा माणूस” असता आणि तो असा बेताल वागला असता तर आतापर्यंत या समाजाने काय केले असते , याची कल्पना देखील करता येत नाही ! म्हणून आपल्या सन्माननीय गायक कलावंतांनी आपलेपणाचा गैरफायदा घेऊन महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य बाधित करू नये , असे आपुलकीच्या भावनेने व प्रेमाने सांगावेसे वाटते.
—— शांत चैत्यभूमी अभियान, मुंबई