“छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क): त्याचं पहिलं लग्न झाल्याचं माहीत असूनही, एका महिलेने त्याच्यासोबत पती-पत्नी म्हणून अनेक वर्षे संसार केला. या कालावधीत त्यांना दोन मुलंही झाली. मात्र, काही वर्षांनी महिलेचा “साक्षात्कार” झाला की तिच्यावर बलात्कार झाला आहे! या आरोपानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि नंतर कोर्टात धाव घेतली.
प्रकरण गंभीर दिसत असलं तरी चौकशीदरम्यान महिलेच्या आरोपांमध्ये विसंगती उघडकीस आली. अखेरीस, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हा खटला फेटाळून लावत आरोपींची निर्दोष सुटका केली.
काय घडलं होतं?
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडलेल्या या घटनेत, एका महिलेने एका कुटुंबातील सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तिच्या प्रियकराने खोट्या लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आणि त्याच्या कुटुंबीयांनीही या गोष्टीला पाठिंबा दिला.
पोलिसांना हा आरोप खोटा असल्याची शंका आल्याने तपास सुरू करण्यात आला. मात्र, महिला पोलिसांच्या भूमिकेवर नाराज होऊन चोपडा न्यायालयात गेली. कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपींवर बलात्कार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
खंडपीठाचा निर्णयया प्रकरणात ad. भूषण महाजन यांच्या वकिलीत आरोपींनी खंडपीठात याचिका दाखल केली. तपासादरम्यान उघड झालं की, संबंधित महिला आणि पुरुष पती-पत्नीप्रमाणे अनेक वर्षे राहत होते. त्यांच्या नात्यात संमतीचे संबंध होते, असा ठोस पुरावा समोर आला. कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलं की, संमतीने सुरू असलेल्या संबंधांना नंतर बलात्कार म्हणणं बेकायदेशीर ठरेल.यामुळे कोर्टाने दोषारोपपत्र फेटाळून गुन्हा रद्द केला.
खोट्या आरोपांचं वाढतं प्रमाण
अलीकडच्या काळात काही महिलांकडून संमतीने सुरू असलेल्या नात्यांवर अचानक खोटे आरोप होण्याच्या घटना वाढत आहेत. असे आरोप केवळ आर्थिक फायद्यासाठी किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे केले जातात, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
या प्रकरणाने खोट्या बलात्काराच्या तक्रारींमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या पुरुषांच्या आयुष्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पुरुषांविरुद्ध दाखल होणाऱ्या अशा प्रकारच्या खोट्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दोषी-निर्दोष ठरवण्यासाठी वेगळ्या नियमावलीची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञ सुचवतात.
शेवटी…
या प्रकरणाने समाजात खोट्या आरोपांमुळे होणाऱ्या नुकसानाचं वास्तव समोर आणलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाने या कुटुंबाचं नाव पुन्हा स्वच्छ झालं असलं तरी अशा बनावट गुन्ह्यांमुळे झालेलं मानसिक आणि सामाजिक नुकसान भरून काढणं कठीणच आहे.