पैठण (निळे प्रतीक न्यूज नेटवर्क): हिरडपुरी (ता. पैठण) येथे अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनाच्या सुटकेसाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल विभागाच्या हस्तक असलेल्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (३ मार्च) सायंकाळी अटक केली. या कारवाईत महसूल अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असले तरी, त्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, संबंधित अधिकारी एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याची चर्चा असून, त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिरडपुरी येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी पाच वाहने प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जप्त केली होती. यातील एका वाहनाचा दंड भरूनही त्याची सुटका करण्यात आली नव्हती. वाहन सोडण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर २ लाख रुपये ठरले. यातील ९० हजार रुपये आधीच दिले गेले होते. मात्र पुढे लाच देण्याची इच्छा नसल्याने वाळू व्यावसायिकाने अहिल्यानगरच्या एसीबीकडे तक्रार केली
एसीबीने सोमवारी सायंकाळी सापळा रचून उर्वरित १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एजंटला रंगेहाथ पकडले. चौकशीत महसूल विभागातील एका अधिकाऱ्याच्या सहभागाचा खुलासा झाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, हा अधिकारी एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, इतर वेळी कारवाई करताच माहिती देणाऱ्या एसीबीने यावेळी आरोपींची नावे उघड केलेली नाहीत.
दरम्यान, एसीबीच्या पथकाने मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथे या अधिकाऱ्याच्या घरावर झडती घेतली. त्यातून कोणते पुरावे सापडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.