‘निळे प्रतीक’ न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर: दि. २४
जालना रोडवरील राम नगर बस स्टॉपजवळ धुत हॉस्पिटल समोर एका कारला अचानक भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली असून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ही घटना आज संध्याकाळच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. कारमधील व्यक्तींना वेळीच बाहेर काढण्यात आले की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. विशेषतः जालन्याकडून येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे वाहतूक पोलीस आणि प्रशासनाला कोंडी सोडविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे नेमके कारण काय, याबाबत सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.