पैठण (निळे प्रतीक न्यूज नेटवर्क) – दोन दिवसांपूर्वी नाथसागरातील पंपहाउस परिसरात एका महिलेचा मृतदेह कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेनंतर सोमवारी (३ मार्च) एका दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह कापडी पिशवीत बांधून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या दोघांचा संबंध असल्याचा संशय असून, त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास मासेमारी करणाऱ्याला पंपहाउसजवळील साखळी क्र. ४२ जवळ कापडी पिशवीत बांधलेला चिमुकल्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
मृत चिमुकल्याच्या अंगावर आकाशी फुल बाह्यांचा टी-शर्ट होता, उजव्या हातात आणि डाव्या पायात काळा धागा तर डाव्या हातात काळ्या-पांढऱ्या मन्यांचा धागा बांधलेला होता.
या दुहेरी मृत्युप्रकरणाच्या तपासासाठी पैठण आणि पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे आणि त्यांच्या टीमने तपास सुरू केला आहे.
दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या महिलेचा मृतदेहही बेडशीटमध्ये गुंडाळलेला आणि कमरेला दगड बांधलेला होता. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांत तिच्या मुलाचाही मृतदेह मिळाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. पोलीस आता या माय-लेकाच्या रहस्यमय मृत्यूच्या मागचे सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत.