छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :वाळूज एमआयडीसी येथे १९ वर्षीय तरुणीचा वारंवार छळ करून तिच्यासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गजानन फरकाडे (वय २५, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरुणीच्या तक्रारीनंतर सुरुवातीला पोलिसांनी आरोपीला समज दिली होती, मात्र तो सतत त्रास देत राहिल्याने अखेर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.
अश्लील वर्तन आणि धमकी
पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, गजानन मागील काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. मंगळवारी (२८ जानेवारी) रात्री ९ वाजता तो दुचाकीवरून तिच्या घरासमोर आला आणि अश्लील भाषेत बोलू लागला. त्याने तिला दुचाकीवर बसण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर त्याने अश्लील चाळे केले आणि “तुला जास्त मस्ती आली आहे, बाहेर ये, मारून टाकतो,” अशी धमकी दिली.
तरुणीच्या लहान बहिणीने वडिलांना माहिती दिल्यानंतर ते बाहेर आले, ते पाहून आरोपी पळून गेला. त्यानंतर तरुणीने वडिलांसोबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी महिलांना कोणत्याही प्रकारच्या छळाला भीक न घालता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. गरज भासल्यास ११२ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून मदत घेण्याचे त्यांनी सुचवले आहे.