मुंबई: खगोलशास्त्र प्रेमींसाठी २८ फेब्रुवारी हा विशेष दिवस ठरणार आहे. या दिवशी सूर्यमालेतील सर्व ग्रह एका रेषेत येणार असून, एक अद्भुत खगोलीय घटना पाहण्याची संधी मिळणार आहे.
या घटनेला ‘ग्रह परेड’ म्हणतात. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या परेडचा कळस २८ फेब्रुवारीला होणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, अशी दुर्मिळ घटना पुन्हा १५ वर्षांनी, म्हणजेच २०४० मध्येच पाहायला मिळेल.
ग्रहांची परेड कशी पाहता येईल?
२८ फेब्रुवारीच्या रात्री काही काळासाठी हे दृश्य स्पष्टपणे दिसेल. शहरातील कृत्रिम प्रकाशापासून दूर जाऊन उघड्या आकाशाखाली याचा आनंद घ्यावा, असे तज्ज्ञ सुचवतात. जर हवामान स्वच्छ राहिले, तर युरेनस आणि नेपच्यून वगळता इतर सर्व ग्रह नजरेस पडतील. युरेनस आणि नेपच्यून पाहण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग करावा लागेल.
शास्त्रज्ञांच्या मते, पूर्व दिशेला मंगळ, आग्नेय दिशेला गुरु आणि युरेनस, तर पश्चिम दिशेला शुक्र, नेपच्यून आणि शनि दिसतील.
ही ग्रह परेड विशेष का आहे?
जेव्हा सूर्यमालेतील ग्रह सूर्याच्या एका बाजूला एकत्र दिसतात, तेव्हा त्याला ‘ग्रह परेड’ असे म्हणतात. या परेडमध्ये तीन ते आठ ग्रहांचा समावेश असतो. सहा ग्रह एका रेषेत दिसणेही अत्यंत दुर्मिळ असते. जानेवारी महिन्यात आंशिक ग्रह परेडसोबत क्वाड्रंटिड उल्कावर्षाव झाला होता. मात्र, २८ फेब्रुवारीची ग्रह परेड अधिक रोमांचक ठरणार आहे.
ही घटना संपूर्ण भारतात पाहता येईल. हवामान स्वच्छ असल्यास, डोळ्यांनी किंवा दुर्बिणीच्या मदतीने हे अद्भुत दृश्य अनुभवता येईल. खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाशप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.