वाळूज महानगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) : वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी येथील निरंकारनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या सासऱ्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, वादाच्या दरम्यान सासऱ्याने तिच्यासमोर अश्लील वर्तन केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा तपशील:
तक्रारदार विवाहित महिला आपल्या पती, दीर आणि सासूसोबत राहत असून, तिचे सासरे दुसऱ्या महिलेसोबत शेजारीच राहतात. सोमवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी चारच्या सुमारास सासरे घरासमोरील अंगणात कपडे धुत असताना पाणी सांडत होते. यावरून सासू आणि सुनेने त्यांना विरोध केला. त्यामुळे ते संतप्त झाले आणि दोघींना शिवीगाळ करत मारहाण करण्यासाठी घरात घुसले.
सासऱ्याने सासू-सुनेला हाताने मारहाण करत स्वतःचे कपडे उतरवले आणि अश्लील वर्तन केले. या प्रकरणी सुनेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी संशयिताचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.