छत्रपती संभाजी नगर, दि. २७ जानेवारी २०२५, जिथे एकीकडे देश संविधान लागू होण्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त अभिमान व्यक्त करत आहे, तिथेच दुसरीकडे अमृतसरमधील सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळच्या हेरिटेज स्ट्रीटवर परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड आणि संविधानाच्या प्रतीची जाळपोळ झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही कृती केवळ प्रतीकात्मक हल्ला नसून, दबले-कुचले वर्ग त्यांच्या हक्कांपासून आणि सन्मानापासून वंचित ठेवण्याचा सुनियोजित कट आहे.
ही घटना ‘आम आदमी पार्टी’ सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, कारण इतक्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणीही नागरिक आणि प्रतीकांच्या सुरक्षेला पुरेसा प्राधान्य दिलं गेलं नाही. जातीयवादी मानसिकता आणि विशेषाधिकार टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींनी असे भ्याड कृत्य करून बाबासाहेबांच्या न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या विचारांना आव्हान दिले आहे.
संपूर्ण देश संविधानाच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त अभिमानाने साजरी करत असताना, अशा घटना आपल्याला आठवण करून देतात की जातीयवाद हा केवळ इतिहासाचा भाग नसून, आजही एक गंभीर आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी समाजाने संघटित होऊन निर्णायक लढा उभारला पाहिजे.
पंजाब पोलीस यांना दोषींवर त्वरित कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून समाजात हा संदेश जाईल की संविधानाच्या प्रतिष्ठेला आणि बाबासाहेबांच्या आदर्शांना विरोध करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसणार आहे. आता वेळ आली आहे की आपण संविधानाची प्रतिष्ठा टिकवून ठेवत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी जातीयवाद आणि द्वेषाचा नायनाट केला पाहिजे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्याचे कोणी हिम्मत करणार नाही..