छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :शहरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करत सायबर भामट्याने क्रेडिट कार्डच्या नावाखाली सीमकार्ड हॅक करून त्याच्या बँक खात्यातून तब्बल ३.२५ लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्यापाऱ्याची सायबर फसवणूक
राकेश राजू गुराल्ले (वय ३४, रा. अंगुरीबाग, छत्रपती संभाजीनगर) हे एसएस स्पोर्ट्स वेअर फर्मचे मालक आहेत. त्यांचा अॅक्सिस बँकेत बचत व चालू खाते आहे. २३ मे २०२४ रोजी त्यांना अनोळखी नंबरवरून क्रेडिट कार्ड मंजूर झाल्याचा कॉल आला. मात्र, त्यांनी क्रेडिट कार्डसाठी कोणतीही विनंती केलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी भामट्याला पॅन कार्ड माहिती देण्यास नकार दिला.
सीमकार्ड हॅकिंग आणि बँक खात्यातून रक्कम लंपास
त्याच दिवशी गुराल्ले यांचे सीमकार्ड अचानक बंद झाले. कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर सीम करप्ट झाल्याचे सांगण्यात आले. २५ मे रोजी दिल्लीत त्यांनी नवीन सीमकार्ड घेतले, परंतु एसएमएस सेवा २४ तासांनीच सुरू झाली.
२८ मे रोजी सेवा सुरू झाल्यावर त्यांना आलेल्या मेसेजमधून ९९,९९९ रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाल्याचे समजले. त्यांनी त्वरित १९३० हेल्पलाईनवर तक्रार केली. १ जूनला आणखी ६०,००० रुपये, तसेच २९ मे ते ३१ मे दरम्यान एकूण १.६४ लाख रुपये त्यांच्या खात्यातून काढण्यात आले.
एकूण फसवणूक – ₹३,२४,६९२
गुराल्ले यांनी १२ जून रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली, परंतु १८ फेब्रुवारी २०२५ रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करत असून, पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी कॉल, एसएमएस किंवा सीमकार्ड संबंधित समस्या आल्यास तत्काळ बँक व सायबर सेलकडे संपर्क साधावा.