पैठण (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) : बिडकीनमध्ये एका १४ वर्षीय नववीत शिकणाऱ्या मुलीच्या हुशारीमुळे संभाव्य अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. शुक्रवारी (दि. ७) दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलीला एक अनोळखी व्यक्ती थांबवत तिच्या वडिलांची ओळख सांगत दुचाकीवर बसण्याचा आग्रह धरत होता. मात्र, मुलीला शंका आल्याने तिने त्याच्यावर उलट प्रश्नांचा भडिमार केला. त्याला उत्तर देता न आल्याने तो घाबरून पसार झाला.
नेमके काय घडले?
बिडकीन येथील सरस्वती भुवन शाळेत शिकणारी १४ वर्षीय मुलगी शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर गेटजवळ उभी होती. त्याचवेळी एक अनोळखी दुचाकीस्वार तिच्याजवळ आला व तिच्या वडिलांची ओळख सांगून घरी सोडण्याची तयारी दाखवली. मात्र, सतर्क मुलीला संशय आल्याने तिने त्याला प्रतिप्रश्न केला – “माझ्या पप्पांना फोन करा, मी स्वतःच त्यांच्याशी बोलेन.” यावर तो व्यक्ती गडबडला व “माझ्या मोबाइलमध्ये बॅलन्स नाही” असे कारण सांगू लागला.
मुलीला अधिक संशय आल्याने तिने धैर्याने त्याच्यापासून अंतर ठेवत परत शाळेत धाव घेतली. काही वेळाने परत बाहेर आल्यावर तिला तो व्यक्ती तिथून पसार झाल्याचे लक्षात आले. घरी गेल्यावर तिने ही घटना वडिलांना सांगितली. त्यांनी तातडीने बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही अभावी संशयिताचा तपास कठीण
या घटनेनंतर शाळेतील आणि परिसरातील सुरक्षा उपायांबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारी आदेशानुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असले तरी सरस्वती भुवन शाळेसमोर कॅमेरे नाहीत, आणि शाळेतील कॅमेरेही बंद आहेत. यामुळे पोलिसांना संशयिताचा शोध घेण्यास अडचण येत आहे.
शाळेत सत्कार आणि पालकांना सतर्कतेचा सल्ला
या मुलीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शनिवारी (८ फेब्रुवारी) शाळेने तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर ग्रामस्थांनीही तिचे कौतुक केले. पालकांनीही आपल्या मुलांना सतर्क राहण्याचा आणि अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.सध्या पोलीस त्या दुचाकीस्वाराचा कसून शोध घेत असून, नागरिकांना कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.