लासूर स्टेशन (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) : तिन्ही पत्नीने सोडून दिल्यानंतर इरफान शेख (३५, रा. लासूर स्टेशन, ता. गंगापूर) याने मोनिका मार्कस झांबरे उर्फ सुमित निर्मळ (३०, रा. रमाबाईनगर, जालना) हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. परंतु, नंतर तिच्या वागण्यात बदल झाल्याने संतप्त इरफानने तिला भेटायला बोलावून निर्दयतेने हत्या केली.
विश्वासघाताने सुरुवात, हत्येने शेवट
मोनिका छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका होती. ती पतीपासून विभक्त राहून जालन्यात आईसोबत राहत होती. रेल्वेस्थानकावरील रोजच्या प्रवासात तिची ओळख वाहनतळावर काम करणाऱ्या इरफान शेखशी झाली. “तुला पतीसोबत पुन्हा एकत्र आणतो” असे सांगत त्याने तिच्याशी मैत्री वाढवली, जी नंतर प्रेमसंबंधांमध्ये बदलली.
मात्र, काही काळानंतर मोनिकाने इरफानपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. तिचा फोन सतत व्यस्त राहू लागल्याने तो चिडला. संतापाच्या भरात त्याने तिचा काटा काढण्याचा कट रचला. ६ फेब्रुवारीला त्याने मोनिकाला लासूर स्टेशन येथे बोलावले. त्याआधीच त्याने आपल्या शेतातील पडीक घरात सहा फूट खोल खड्डा खोदून ठेवला होता. मोनिका तिथे गेल्यावर “गंमत दाखवतो” असे सांगत तिचे हात-पाय बांधले आणि तिचा गळा आवळून हत्या केली.
खून लपवण्याचे प्रयत्न
हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी इरफानने मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयांना “मी सुखरूप असून दुसरे लग्न केले आहे. आता वर्षभर भेटणार नाही,” असा मेसेज पाठवला. मात्र, कुटुंबीयांनी कॉल केल्यावर फोन बंद होता. त्यानंतर त्याने मोनिकाचे दागिने लासूर स्टेशन येथील एका सराफाला ४८ हजार रुपयांत विकले आणि तिची बॅग छत्रपती संभाजीनगरमधील एका नाल्यात टाकली.
पोलिस तपास आणि खुनाचा पर्दाफाश
मोनिका बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने कदीम जालना पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी इरफानला चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले, कॉल रेकॉर्ड तपासले आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिले. शेवटी, मोनिका आणि इरफान ६ फेब्रुवारीला एकत्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १३ फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत इरफानने आत्महत्येचा बनाव केल्याचे सांगितले, पण पोलिसांच्या कसून चौकशीत अखेर त्याने खुनाची कबुली दिली. १४ फेब्रुवारीला पोलिसांनी मोनिकाचा मृतदेह पडीक घरातून बाहेर काढला आणि हा संपूर्ण कट उघड झाला.