वाळूज महानगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :–
तिसगाव येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. तलवार, लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांचा वापर करून दोन्ही बाजूंनी जबरदस्त हल्ले करण्यात आले. या हिंसाचारात दोघे गंभीर जखमी होऊन आयसीयूमध्ये दाखल आहेत, तर एकूण सहा ते सात जण जखमी झाले आहेत. संपूर्ण प्रकाराचा थरार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.
प्राथमिक तक्रारीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान जुन्या वैमनस्यातून योगेश कसुरे आणि बिरजू तरैय्यावाले यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर काही मिनिटांतच परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटातील सदस्यांनी हाणामारी सुरू केली. तलवारी, लोखंडी रॉड, लाठ्या आणि चाकूंनी एकमेकांवर हल्ले केले गेले. यामध्ये ऋतिक तरैय्यावालेच्या डोक्यावर तलवारीने वार झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे.
त्यानंतरच्या हल्ल्यात योगेश कसुरे देखील गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर सिडकोतील महावीर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. एकूण २० पेक्षा जास्त जणांवर हल्ला व जखमी करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गित्ते करीत आहेत. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे.