- प्रज्ञावंत कांबळे
महीला दिनी यश क्रीडा मंडळाचा उपक्रम
परभणी/प्रतिनिधी
पुरुषांसम समान दर्जा भारतीय संविधानामुळे महिलांना प्राप्त झाला आहे.महिलांनी स्वतः ला कमी न समजता समाजात आणि प्रशासकीय सेवेत आपल्या अधिकाराचा उपयोग करावा.आणि सर्वांनीच केवळ एक दिवसापूर्ते नव्हे तर नेहमीच महिलांचा आदर करावा असे मत शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी व्यक्त केले.
ग्रास रूट वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत सहसा अधिकाऱ्यांचा संवाद होत नाही. तो आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यश क्रीडा मंडळाने घडवून आणलेल्या स्त्री सन्मान या माध्यमातून आम्हालाही संवाद साधण्याची संधी मिळाली असेही ते म्हणाले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवा नेतृत्व यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध कार्यालय येथे सेवा बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने मागील काही वर्षांपासून यश क्रीडा मंडळ सातत्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शहरातील वाहतूक शाखेतील कार्यरत महिला पोलिसांचा पुष्प गुच्छ व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.परभणी शहर महानगर पालिका प्रभाग समिती (अ) येथे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या उपस्थितीत सफाई महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते यांच्या उपस्थितीत ठाण्यात विविध पदांवर कार्यरत महिला पोलीस अधिकारी कर्मचारी व महिला होमगार्ड यांचा मिठाई व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या सेवेत कार्यरत असलेल्या परिचारिका यांचाही सन्मान करण्यात आला. या सर्व ठिकाणी यश क्रीडा मंडळ अध्यक्ष गौतम भराडे समवेत डॉ सुनिल तुरुकमाने,उमेश शेळके, सुदाम तूपसुंदरे,संजय बगाटे,मिलिंद घुसळे,भूषण मोरे,राहुल वाहीवाळ आदी उपस्थित होते.