निळे प्रतिक न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी नवी दिल्ली दि. ८
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘माता रमाई आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड’ यंदा सुप्रसिद्ध भीमशाहिरा सीमाताई पाटील यांना प्रदान करण्यात आला. हा प्रतिष्ठित पुरस्कार दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त करताना सीमाताई पाटील म्हणाल्या, “या जागतिक स्तरावर मिळणाऱ्या पुरस्काराचे खरे मानकरी आपण सर्वजण आहोत. या प्रवासात सोबत राहिलेल्या प्रत्येकाचा मला अभिमान आहे. उडान टीमचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी माझी या सन्मानासाठी निवड केली.”
भीमशाहीरीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनमानसात रुजवणाऱ्या सीमाताई पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. सीमाताई पाटील यांचा हा गौरव संपूर्ण बहुजन समाजासाठी अभिमानास्पद ठरला आहे.