छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतीक न्यूज नेटवर्क) – काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर, सोमवारी (३ मार्च) संध्याकाळी रेल्वेस्थानकासमोर धावत्या सीएनजी कारने अचानक पेट घेतला. काही क्षणातच कार जळून खाक झाली. मात्र, प्रसंगावधान राखत कारमधील पती, पत्नी आणि तीन मुलांनी तातडीने बाहेर पडल्याने त्यांचा थोडक्यात बचाव झाला.
धूर आणि आवाजाची चाहूल लागताच वाहन सोडले
क्रांती चौकातून महानुभाव आश्रमाच्या दिशेने योगेश सुरासे (रा. जय भवानीनगर) आपल्या कुटुंबासोबत टाटा टिगॉर कारने प्रवास करत होते. अचानक कारमधून शिट्टीसारखा आवाज येऊ लागला आणि धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच योगेश सुरासे यांनी तत्काळ वाहन थांबवून पत्नी व मुलांना सुरक्षित बाहेर काढले.
सीएनजी गॅसकीटमुळे अधिक धोका वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे वेदांतनगर पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझवत मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने सीएनजी टाकी फुटली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, इंजिन गरम झाल्याने किंवा गॅस गळतीमुळे आग लागली असावी.
सिडको एन ९ मध्ये किचनला आग
सिलेंडर फुटण्याचा धोका टळलासिडको एन ९ परिसरातील गोपाल देवीलाल शिरे यांच्या घरात दुपारी अचानक किचनमध्ये आग लागली. स्वयंपाकघराच्या एक्झॉस्ट फॅनजवळून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने जोर धरला. घरातील सदस्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला माहिती दिली.
अग्निशमन अधिकारी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. काही मिनिटांतच आग आटोक्यात आणण्यात यश आले.
छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याची झळ
तापमानात वाढसोमवारी शहराचे कमाल तापमान ३७°C तर किमान तापमान २०.४°C नोंदवले गेले. गेल्यावर्षीच्या तुलनेत तापमानात ४ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे दिसत आहे.