छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतीक न्यूज नेटवर्क) – जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या विरुद्ध चौकशीला सुरुवात झाली आहे. माजी नगरसेविका डॉ. आशा बिनवडे यांनी गर्जे यांच्यावर एजंटांच्या मदतीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे गारखेडा गट नं. ३६/२ मधील ४० आर जमिनीचा फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
बिनवडे यांच्या तक्रारीनुसार, संबंधित जमिनीवर त्यांचा ताबा असून काही लोकांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती हडपण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकरणी सुनावणी झाली होती, मात्र त्यानंतर दीड वर्षांपासून प्रकरण पुढे सरकले नाही. अप्पर तहसीलदार गर्जे यांची भेट घेतल्यावर त्यांनी उर्मट भाषा वापरल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गर्जे यांच्या कडील सर्व अभिलेख मागवले असून, कन्नड उपविभागीय अधिकाऱ्यांना मूळ संचिका ताब्यात घेऊन ७ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास एजंटांचा वावर स्पष्ट होईल, असा दावा बिनवडे यांनी केला आहे. दुसरीकडे, अप्पर तहसीलदार गर्जे यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले असून, ते म्हणाले, “मी गेल्या आठवड्यात रजेवर होतो, प्रकरणाची माहिती घेऊन स्पष्टीकरण देईन. निर्णय कुणाच्या विरोधात गेला की लोक असे आरोप करतात.”
या संपूर्ण प्रकरणावर आता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.