छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. काही वसाहतींमध्ये आधीपासूनच पाणीपुरवठा अपुरा आहे, तर टँकरच्या मदतीने मिळणारे पाणीही आता अपुरे ठरू लागले आहे. महापालिकेच्या टँकर फेऱ्या ३३० पर्यंत वाढल्या असून, खासगी टँकरच्या फेऱ्या १०० च्या पुढे गेल्या आहेत. मार्चनंतर टँकरची मागणी अधिक वाढण्याची शक्यता असून, खासगी टँकरचालकांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
गुंठेवारी भागातील परिस्थिती:
- महापालिकेचे दोन कंत्राटदार, ८६ टँकर, ३३० फेऱ्या
एका नागरिकाला दोन दिवसांतून एक ड्रम पाणी
महिना ३६६ रुपये आगाऊ शुल्क भरावे लागते
महापालिकेला टँकर व्यवस्थापनातून ४० लाख रुपये उत्पन्न
मे महिन्यापर्यंत टँकरची संख्या १०८ आणि फेऱ्या ४८० पर्यंत वाढण्याची शक्यता
महापालिकेकडून दररोज ३ एमएलडी पाणी टँकरपुरते राखीव
खासगी टँकरच्या मनमानी दरवाढीचा फटका:
पाणीटंचाईचा गैरफायदा घेत खासगी टँकरचालक पाणीपुरवठ्यावर मनमानी दर आकारत आहेत. सध्या ५०० लिटर टँकरसाठी ३०० रुपये आकारले जात असून, हा दर मार्चनंतर ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. १००० लिटर टँकरसाठी १२०० ते १५०० रुपये मोजावे लागू शकतात. नळाद्वारेही पाणीपुरवठा अनियमित होत असून, अनेक भागांत आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातही गंभीर स्थिती:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूजल पातळी खालावत असून, अनेक भागांत टँकरची मागणी वाढली आहे. खुलताबादमध्ये भूजल पातळी अत्यंत खाली गेली आहे, तर पैठण परिसरातील स्थिती तुलनेने चांगली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू असून, बोअरवेल आणि विहिरींसाठी परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिदोळकर यांनी दिला आहे.