छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :उस्मानपुरा परिसरातील कबीरनगर येथे घरासमोरील हौदात पडून १ वर्ष १० महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२० फेब्रुवारी) सकाळी घडली
आर्या योगेश थोरात (रा. कबीरनगर, उस्मानपुरा) असे या चिमुकलीचे नाव असून, ती योगेश थोरात यांच्या तीन मुलींमध्ये सर्वात धाकटी होती. त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने व्हरांड्यात तात्पुरता हौद बांधण्यात आला होता. हौदातील पाणी काढण्यासाठी झाकण बाजूला करण्यात आले होते, त्यामुळे तो अर्धवट उघडा राहिला.
खेळता खेळता आर्या घराबाहेर आली आणि हौदात पडली. ही बाब लक्षात येताच तिला तातडीने बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या दुर्दैवी निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, दोन महिन्यांनी होणारा वाढदिवसच काळ ठरला.
या घटनेची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.