छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी (१९ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. जय भवानी, जय शिवरायच्या गर्जनेने संपूर्ण शहर दनानून गेले. मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेल्या मिरवणुका आणि बाईक रॅलींमुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. क्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. हा उत्साह मंगळवारी सायंकाळपासूनच सुरू झाला होता आणि मध्यरात्रीपर्यंत टिकून राहिला.
शहरात एकूण ११० मिरवणुका आणि १७ दुचाकी रॅली निघाल्या. शाळा-महाविद्यालयांमध्येही शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील तरुण-तरुणींनी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. क्रांती चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे परिसर उजळून निघाला होता. तरुणाई जय जिजाऊ, जय शिवाजीच्या घोषणांवर थिरकत होती.
वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर निर्बंध लावण्यात आले होते. मध्यरात्री पोलिसांनी डीजे बंद करत नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन केले. शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ४७४ शिवप्रेमींनी रक्तदान केले.
वाळूज महानगरात शिवजयंतीची भव्य मिरवणूक
वाळूज महानगरातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सजवलेल्या रथासह काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत भगवे ध्वज आणि डीजेच्या तालावर शिवभक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील आणि अन्य मान्यवरांनी शुभारंभ केला. सिद्धिविनायक मंदिर, त्रिमूर्ती चौक, मोहटादेवी मंदिर, लोकमान्य चौक आणि जागृत हनुमान मंदिर मार्गे ही मिरवणूक स्व. रमेश मोरे चौकात समारोप झाली.
याशिवाय, साई युवा मंच आणि परिसरातील इतर संस्थांनीही मिरवणुका काढून शिवरायांना अभिवादन केले. पंढरपूर आणि रांजणगाव शेणपुंजी येथे देखील शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.